शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवूया सभापती सिद्धेश रावराणे

वैभववाडी पंचायत समिती येथे आढावा बैठक संपन्न

सरपंच, ग्रामसेवक व खाते प्रमुख उपस्थित

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. शासनाच्या सर्व योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचल्या पाहिजेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून विकासाचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील. असे प्रतिपादन नूतन सभापती सिद्धेश रावराणे यांनी केले.

वैभववाडी पंचायत समिती येथे लोकप्रतिनिधी, सरपंच व ग्रामसेवक यांचे आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपसभापती साची कोलते, पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, देवानंद पालांडे, गटविकास अधिकारी प्रमेश वाघ, गटशिक्षण अधिकारी श्री. वडर, बाबू देसाई, विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर, कक्ष अधिकारी संतोष टक्के, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

यावेळी सिद्धेश रावराणे म्हणाले, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सर्व ग्रामपंचायतिनी सहभाग घेतला पाहिजे. पंचायत समितीचा कारभार सर्वांना विश्वासात घेऊन पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पाणीटंचाईच्या काळात अधिकारी व ग्रामसेवकांनी काळजी पूर्वक काम केले पाहिजे. तालुक्यातील प्रलंबित विषय पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लावले जातील असे सांगितले.

यावेळी उपसभापती साची कोलते, मंगेश लोके, देवानंद पालांडे, श्री. वाघ यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. सरपंच नरेंद्र कोलते, बाजीराव मोरे, ग्रामपंचायत अधिकारी विद्याधर सावंत यांनी विषयात सहभाग घेतला. नूतन सभापती, उपसभापती व सदस्य यांचा सरपंच संघटना, ग्रामसेवक संघटना, अधिकारी कर्मचारी संघटना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष टक्के आणि मानले.