ओझरम येथे पंचक्रोशी प्रीमियर लीग २०२६चे आयोजन; भव्य क्रिकेट स्पर्धेची रंगत वाढणार

तळेरे (स्वप्निल तांबे) : कणकवली तालुक्यातील ओझरम येथे ओझरम क्रीडा मंडळाच्या वतीने “पंचक्रोशी प्रीमियर लीग २०२६” या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दिनांक ११ एप्रिल ते रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ या कालावधीत ग्रीन पार्क मैदान, ओझरम येथे पार पडणार आहे.

स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून प्रथम क्रमांकासाठी तब्बल ₹५,५५१/- रोख रक्कम व आकर्षक चषक, तर द्वितीय क्रमांकासाठी ₹३,५५१/- रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सामनावीर, मालिकावीर आणि उदयोन्मुख खेळाडू यांनाही विशेष आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेमुळे परिसरात क्रिकेटचा उत्साह शिगेला पोहोचला असून स्थानिक खेळाडूंना आपली कला सादर करण्याची मोठी संधी मिळणार आहे. ओझरम गावात क्रिकेटप्रेमींसाठी ही स्पर्धा एक पर्वणी ठरणार असून मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक उपस्थित राहण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

ओझरम क्रीडा मंडळाने सर्व पंचक्रोशीतील संघांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूंनाही विशेष बक्षिसे देण्यात येणार असल्याने स्पर्धा अधिक रंगतदार होणार आहे.