तडजोडीतून १.८७ कोटी रुपयांची सेटलमेंट; पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शनिवारी (दि. १४ मार्च) आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यमातून एकाच दिवशी तब्बल ९२१ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या प्रकरणांमध्ये एकूण १ कोटी ८७ लाख १९ हजार २८३ रुपयांची तडजोड करण्यात आली.
ही राष्ट्रीय लोक अदालत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आली होती.
लोक अदालतीसाठी तालुका न्यायालयांमध्ये सात पॅनेल, तर जिल्हा न्यायालयात दोन पॅनेल नियुक्त करण्यात आले होते. पॅनेल क्र. १ मध्ये जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांच्यासह विधीज्ञ कोमल म्हाडदळकर यांनी काम पाहिले. पॅनेल क्र. २ मध्ये सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) व मुख्य न्यायदंडाधिकारी ए. जी. देशिंगकर यांच्यासह विधीज्ञ तेजल कुडतरकर यांनी कामकाज पाहिले.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव संपूर्णा गुंडेवाडी उपस्थित होत्या. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी दावे, फौजदारी प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, वीज देयक प्रकरणे, कौटुंबिक वाद तसेच विविध वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.
लोक अदालतीमध्ये पक्षकार आणि विधीज्ञांनी उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमाच्या यशासाठी जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांतील न्यायिक अधिकारी व कर्मचारी यांनी सुमारे दोन महिन्यांपासून विशेष परिश्रम घेतले होते. तसेच पोलिस विभाग व विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी यांनीही या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
लोक अदालतीत तडजोडीच्या माध्यमातून प्रकरणांचा निकाल लागल्याने संबंधित पक्षकारांमधील सामंजस्य व जिव्हाळा कायम राहण्यास मदत झाली, तसेच निकालाविरुद्ध अपील नसल्यामुळे त्यांचा वेळ आणि खर्चही वाचला, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सांगितले.












