बांदा (प्रतिनिधी) : गोवा बनावटीच्या विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांना बांदा पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या कारवाईत दारूसह मोटार असा एकूण ११ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुमारे साडेतीन वाजता बांदा चेकपोस्टवर नियमित वाहन तपासणी सुरू होती. यावेळी संशयास्पद हालचाल करणाऱ्या (एमएच ४३ एन २३३९) क्रमांकाच्या मोटारीला थांबवून झडती घेण्यात आली.
झडतीदरम्यान गाडीत गोवा बनावटीच्या विविध नामांकित ब्रँड्सच्या विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. या कारवाईत सुमारे ४ लाख ८ हजार रुपयांची दारू व ७ लाख रुपये किमतीची मोटार असा एकूण ११ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी प्रशांत रवींद्र जाधव (वय ३३, रा. राजापूर बौद्धवाडी, जि. रत्नागिरी) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध पुढील कारवाई सुरू आहे.
ही धडक कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दासू पवार तसेच पोलिस कर्मचारी प्रथमेश पोवार, प्रसाद पाटील, नेल्सन फर्नांडिस आणि प्रशांत बोठे यांच्या पथकाने केली. पुढील तपास बांदा पोलीस करत असून, या प्रकरणामागील मोठ्या रॅकेटचा शोध लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












