नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते शहरात सहा विकासकामांचे भूमिपूजन

माजी नगराध्यक्ष संजू परब यांची प्रमुख उपस्थिती ; सांडपाणी आणि गटार व्यवस्थापनावर नगरपरिषदेचा भर

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्येय डोळ्यासमोर ठेवून सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून विकासकामांचा धडाका लावला आहे. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते शहरातील विविध प्रभागांतील सहा महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. प्रामुख्याने पावसाळी पाण्याचा निचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी ही कामे हाती घेण्यात आली असून, यामुळे शहरातील अनेक प्रलंबित नागरी समस्या मार्गी लागणार आहेत.

यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांची प्रमुख उपस्थिती होती. शहराच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या कामांमध्ये प्रामुख्याने खासकीलवाडा आणि परिसरातील सांडपाणी निचरा व्यवस्थेवर भर देण्यात आला आहे. यात

खासकीलवाडा येथील गवस पाणंद येथील पाटणकर घराच्या बाजूने असलेल्या नाल्याचे संरक्षक भिंत बांधणे, नाडकर्णी हॉलपासून पुढील गटार प्रणाली बंदिस्त करणे, गजानन सुभेदार यांच्या घरापासून निर्गुण यांच्या घरापर्यंतच्या गटाराची दुरुस्ती, तसेच महादेव भाटले, सतिश सावंत ते अशोक सावंत यांच्या घरापर्यंत नवीन गटार बांधणे, दत्त रेसिडेन्सी गृहनिर्माण संस्थेजवळील शासकीय जागेतील गटार बंदिस्त करून त्यावर पेव्हिंग ब्लॉक्स बसवून लादीकरण करणे,

पारसेकर घर ते पटेकर घर या दरम्यान नवीन गटार बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.

या विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, माजी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेविका स्नेहा नाईक, माजी नगरसेवक उदय नाईक यांच्यासह नगरपरिषदेचे संबंधित अभियंता, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराच्या विविध भागांत ही कामे सुरू झाल्याने स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.