मालवणवासीयांच्या त्रासाला महावितरणचा निष्काळजीपणा आणि सत्ताधाऱ्यांची निष्क्रियता कारणीभूत : वैभव नाईकांची टीका
मालवण (प्रतिनिधी) : मान्सूनच्या आगमनासाठी सज्ज असल्याच्या वलग्ना करणाऱ्या महावितरणचे पहिल्याच पावसात वाभाडे निघाले असून पावसाच्या आगमनालाच मालवण शहर आणि तालुका दोन दिवस अंधारात बुडाला आहे. यामुळेनागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यावरून आक्रमक झालेल्या ठाकरे शिवसेना पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आज कार्यकर्त्यांसह येथील महावितरण कार्यालयावर थेट धडक दिली. यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता सचिन मेहेत्रे हे कार्यालयात अनुपस्थित असल्याने शिवसैनिकांचा पारा अधिकच चढला.
वर्षभर देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करून पहिल्याच पावसात दोन-दोन दिवस वीज गुल राहत असेल, तर महावितरणने वर्षभर नक्की काय घोडं मारलं?” असा संतप्त सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित केला. या गंभीर परिस्थितीवर बोलताना वैभव नाईक यांनी सत्ताधाऱ्यांवरही घणाघाती टीका केली. तालुक्यात विजेअभावी सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत असताना, सत्ताधाऱ्यांना मात्र याचे काहीच सोयरसुतक उरलेले नाही. त्यांचे या ज्वलंत समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे, असा घणाघात वैभव नाईक यांनी केला. दोन दिवस विजेविना काढणाऱ्या मालवणवासीयांच्या त्रासाला सर्वस्वी महावितरणचा निष्काळजीपणा आणि सत्ताधाऱ्यांची निष्क्रियता कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मालवण शहराला आचरा, विरण आणि कुडाळ अशा तीन वेगवेगळ्या मुख्य वाहिन्यांवरून वीजपुरवठा केला जातो. एकाच वेळी या तिन्ही लाईन पहिल्याच पावसात निकामी कशा काय होतात? महावितरणने मान्सूनपूर्व कामांच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवले का?” असा जाब नाईक यांनी विचारला. तालुक्यात सुरू असलेल्या भूमिगत वीज वाहिन्यांच्या सुमार कामावरही त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. अनेक ठिकाणी या वाहिन्या जमिनीच्या वर आल्या असून यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत महावितरणने या वाहिन्या आपल्या ताब्यात घेऊ नयेत, अशा कडक सूचना माजी आमदार वैभव नाईक यांनी कुडाळचे कार्यकारी अभियंता यांना भ्रमणध्वनीवरून दिल्या.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख किरण चव्हाण, उमेश चव्हाण, नगरसेवक मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत, अनिता गिरकर, उमेश मांजरेकर, राजू मेस्त्री, महेश जावकर, वायरी भूतनाथचे सरपंच भगवान लुडबे, रेवंडीचे सरपंच अमोल वस्त, किशोर गावकर, सिद्धेश मांजरेकर आदी उपस्थित होते. यापुढील काळात जर वीजपुरवठा विनाकारण खंडित झाला किंवा भूमिगत वाहिन्यांच्या कामात हलगर्जीपणा दिसून आला, तर महावितरणला यापेक्षा तीव्र शिवसेना स्टाईल आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.













