Breaking News

डी. टी. एस. ई. मार्फत घेतली जाणारी इस्रो अंतराळ प्रदर्शन भेट परीक्षा उत्साहात संपन्न

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : डायमंड टॅलेंट सर्च एक्झामिनेशन (DTSE) मार्फत आयोजित करण्यात आलेली इस्रो अंतराळ प्रदर्शन भेट परीक्षा महाराष्ट्रातील सहा केंद्रांवर मोठ्या उत्साहात पार पडली. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डी. टी. एस. ई. संस्थेमार्फत दरवर्षी नर्सरी ते इयत्ता आठवीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो अंतराळ प्रदर्शन भेट परीक्षेत सहभागी होण्याची संधी दिली जाते.

यंदाची परीक्षा शाहू हायस्कूल, बारामती (जि. पुणे), आरएमडी इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर, इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वेळापूर (जि. सोलापूर), विद्याधाम विद्यामंदिर, कणकवली (जि. सिंधुदुर्ग), सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल, फुरसुंगी (हवेली) आणि आर. के. इंटरनॅशनल स्कूल, तुळजापूर (जि. धाराशिव) या केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, अंतराळ संशोधन आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी आवड निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत पालक व शिक्षकांनी व्यक्त केले.दरवर्षी या परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून, पुढील वर्षी होणाऱ्या इस्रो अंतराळ प्रदर्शन भेट परीक्षेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी चालू वर्षाच्या डी. टी. एस. ई. परीक्षेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.