कोकणातील शेतकऱ्याला गृहीत धरू नका; राजू शेट्टी

सिंधुदुर्गात आंबा, काजू प्रश्नी १२ मार्चला मोर्चा काढणार

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांना हेक्टरी ५ लाख रुपये आणि ३ लाख रुपये नुकसान भरपाई सरकारकडून मिळावी, त्याचबरोबर इतर अनेक प्रश्नांच्या संदर्भात सरकारने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी येत्या 12 मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढायचा निर्णय वेंगुर्ला येथे आयोजित आंबा बागायतदारांच्या बैठकीमध्ये झालेला आहे.

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंबा बागायतदार, काजू बागायतदार या ठिकाणी मोठ्या संख्येने येणार आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असून ६ मार्चला बजेट आहे. त्या बजेटमध्ये काही भरीव तरतूद करून आंबा उत्पादक आणि काजू उत्पादकांना दिलासा सरकारने दिला पाहिजे. तो जर का दिलासा नाही मिळाला, तर निश्चितच १२ मार्चला प्रचंड मोठा मोर्चा आम्ही काढणार आहोत.