सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्ह्यात कुस्ती खेळाचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
मुलांच्या परीक्षा संपल्यात. आता उन्हाळा सुट्टीत काय करायचे, असा विचार पालकांच्या मनात आला असेलच. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, खेळाचे मूलभूत कौशल्य आत्मसात व्हावे तसेच स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व निर्माण करण्याकरिता येणाऱ्या प्रत्येक संकटांना जिद्दीने लढा देता यावा या उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय, सिंधुदुर्गतर्फे कुस्ती या खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण शिबीर अनिवासी तसेच निःशुल्क आहे. कुस्तीचे प्रशिक्षण २३ एप्रिल ते २ मे या कालावधीत सकाळी ८ ते १० या वेळेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता राज्य क्रीडा मार्गदर्शक माधुरी घराळ, मो. क्र. ९८६७६९९२८१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












