टायर फुटल्याने दुभाजक तोडून डंपर महामार्गावर पलटी

खडी रस्त्यावर पसरली; वाहतूकीचा खोळंबा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कसाल ते गोव्याच्या दिशेने खडी वाहतूक करणाऱ्या डंपरचा टायर फुटल्याने तो दुभाजक तोडून पलिकडच्या बाजूला पलटी झाला. या अपघातात डंपर चालक थोडक्यात बचावला मात्र डंपरमधील खडी रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने वाहतूकीचा मोठा खोळंबा झाला. मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगांव जोशी मांजरेकरवाडी येथे आज दुपारी २ च्या सुमारास हा अपघात झाला.

अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला पलटी झालेल्या डंपरच्या केबिनमधून सुरक्षित रित्या बाहेर काढले. या नंतर महामार्गावरून जाणाऱ्या जेसीबीला थांबवून जेसीबीच्या मदतीने रस्त्यावरील खडी बाजूला काढण्यात आली. त्यामुळे बराच वेळ खोळंबलेली वाहतूक सुरळीत झाली. पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सायंकाळी उशिरा अपघातग्रस्त डंपर बाजूला करण्यात आला.