Breaking News

संदेश सावंतांचा पुढाकार आणि रखडलेल्या नरडवे-पवारवाडी रस्त्याचे काम लागले मार्गी

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत यांच्या पुढाकाराने नरडवे गावातील पवारवाडीला जाणाऱ्या रस्त्याचे काम अखेर मार्गी लागले असून सदर कामाचे भूमिपूजन संदेश सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. नरडवे गावातील पवारवाडी वस्तीत जाणारा रस्ता दलित वस्ती सुधार योजनेतून मंजूर झाला होता. नरडवे मुख्य रस्ता ते पवारवाडी पर्यंत जाणारा सिमेंट काँक्रीट रस्ता बनविण्यासाठी 8 लाखांचा निधीही मंजूर झाला होता. मात्र मंजूर होऊनही या रस्त्याचे काम सुरू झाले नव्हते.

नवनिर्वाचित जि. प. सदस्य संदेश सावंत यांच्या पुढाकाराने पवारवाडीकडे जाणाऱ्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी शुभारंभकरण्यात आला. या रस्त्याच्या कामामुळे पवारवाडीतील सुमारे दीडशेहून अधिक ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची रस्त्याच्या कामाची मागणी पूर्ण होणार आहे. काँक्रीट रस्त्यालगत स्ट्रीट लाईटचे कामही लवकरच मार्गी लावू अशी ग्वाही यावेळी जि. प. सदस्य संदेश सावंत यांनी स्थानिक ग्रामस्थांना दिली. यावेळी नरडवे सरपंच गणपत सावंत, माजी उपसरपंच वैभव नार्वेकर तसेच पायरवाडीतील सर्व जेष्ठ ग्रामस्थ व महिलाभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्ता कामाला सुरुवात केल्याबद्दल पवारवाडीतील सर्व ग्रामस्थांनी जि. प. सदस्य संदेश सावंत यांचे आभार मानले.