सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरात मोकाट कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. पालिका प्रशासन आणि नवनिर्वाचित नगरसेवक मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी घोषणा करत आहेत. मात्र, अद्याप कुठलीच घोषणा प्रत्यक्षात उतरलेली नाही. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निशांत तोरसकर यांनी भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम हाती घेण्याचे ठरविले आहे. कुत्र्यांसाठी शेल्टर होम सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांनी पावले उचलली आहेत.
सावंतवाडीच्या जनतेला मोकाट कुत्र्यांच्या दहशतीपासून दूर करण्याच्या दृष्टीने तोरसकर मैदानात उतरले आहेत. शहरातील सबनीसवाडा परिसरात भटक्या श्वानांच्या वाढत्या त्रासामुळे नागरिक चिंतेत असताना निशांत तोरसकर व त्यांचे सहकारी डॉ. चंद्रशेखर गवस यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने सर्व भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र शेल्टर होम उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे. या उपक्रमामुळे भटक्या श्वानांची संख्या नियंत्रित होण्यास मदत होणार आहे.
त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीसाठी, तोरसकर रिंगणात होते. तेव्हा पराभव होऊनही ते आता नागरिकांसाठी कार्यरत आहेत.












