‘मटण-भाकरी’ प्रसादासाठी भाविकांची गर्दी
नांदगाव (प्रतिनिधी) : ‘मटण व भाकरी’ प्रसादासाठी प्रसिद्ध असलेली नांदगाव येथील श्रीदेव कोळंबाची जत्रा रविवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली. श्री देव कोळंबाच्या जयघोषाने अवधी नांदगाव नगरी दुमदुमली होती श्रीदेव कोळंबाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. सकाळ सत्रात नवस फेडण्यासाठी कोंबडी, बकरे घेऊन तर सायंकाळी मटण-भाकरीच्या महाप्रसादाला भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे श्रीदेव कोळंबा परीसर भक्तीसागरात न्हावून गेला होता. कोंबडे व बकरे विक्रीसह अन्य व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती.
सिंधुदुर्गसह महाराष्ट्र, गोवा राज्यात प्रसिध्द श्री देव कोळंबाचा जत्रोत्सवास रविवारी सकाळी उत्साही प्रारंभ झाला. श्री देव कोळंबाच्या विधीवत पूजे नंतर भाविकांनी नवस फेडण्यास सुरवात केली. सायंकाळ श्री देव कोळंबास नवीन नवस सांगण्यात आले. त्या नंतर भाविकांना मटण-भाकरी प्रसाद वाटपास सुरूवात झाली. या प्रसादासाठी भाविकाची झुंबड उइली होती. असंख्य भाविकांनी श्रीदेव कोळंबाचे मनोभाचे दर्शन घेतले. यात्रा परिसर भाविकांबरोबरच कोंबडी, बकयांमुळे भरून गेला होता. दुपारच्या वाढत्या उन्हाबरोबरच गर्दी वाढू लागल्याने दर्शनाची रांगही लांब पर्यंत लागली होती. कोळंबा यात्रेसाठी जिल्ह्यातील भक्तांबरोबर मुंबईकर चाकरमानी, विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, पदाधिकारी, पर्यटक, इतर राज्यातील भाविकांनी हजेरी लावली. भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होवू नये यासाठी श्री देव कोळंबा देवस्थानचे अध्यक्ष नागेश मोस्ये, सहकारी व नांदगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांनी यात्रेचे परिपूर्ण नियोजन केले होते. वाहनासाठी पार्किंग व्यवस्था, दर्शनासाठी रांगेची व्यवस्था, विविध वस्तू व खाद्याची दुकाने, आरोग्य केंद्राचे पथक, स्वयंसेवक यामुळे यात्रेमध्ये सुरळीपणा आणवत होता. यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक मंडप व विद्युत रोषणाई यामुळे मंदिर परिसर झळाळून निघाला होता.













