Breaking News

कणकवलीत १ कोटींच्या “श्री स्वयंभू नमो उद्यान” चे भूमिपूजन

नागरिकांना विरंगुळा व अन्य सुविधा उपलब्ध होणार – नगराध्यक्ष संदेश पारकर

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सुतारवाडी-निमेवाडी येथे साकारण्यात येणाऱ्या एक कोटी रुपये खर्चाच्या ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले की, कणकवली शहरात विविध विकासकामे प्रस्तावित असून त्याचाच एक भाग म्हणून आधुनिक सुविधांनी युक्त उद्याने उभारली जात आहेत. अशा उद्यानांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा आणि संवादासाठी स्वतंत्र जागा मिळणार आहे.

तसेच लहान मुलांच्या खेळण्यासाठी आणि नागरिकांच्या मनोरंजनासाठी शहरात आणखी अद्ययावत उद्याने उभारण्याचा नगरपंचायतीचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात कणकवली नगरपंचायत विकासाच्या दृष्टीने भरीव कामगिरी करताना दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या भूमिपूजन कार्यक्रमास उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी आमदार राजन तेली, नगरसेवक संकेत नाईक, लूकेश कांबळे, दिवाकर मुरकर, महेश कोदे तसेच प्रशासन अधिकारी अमोल अगम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.