पुणे (प्रतिनिधी) : राज्यात सध्या पावसाचा खंड पडला असला, तरी लवकरच पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. १७ जुलैपासून राज्यात मोसमी वारे परतणार आहेत.
अरबी समुद्रावरुन येणारे पश्चिमी वारे तीव्र होणार आहेत. तसेच २० जुलैच्या आसपास बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्याने पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे सुरुवातील कोकण, त्यानंतर सह्याद्री घाट तसेच हळूहळू मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा प्रभाव वाढणार आहे. याबाबत माहिती देताना हवामानतज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, ‘१७ जुलैपासून कोकण, पुणे, नाशिक, सातारा घाट परिसरात पावसात वाढ होणार आहे. काही दिवसांत अरबी समुद्रावरुन येणारे पश्चिमी वारे अधिक बळकट होणार आहेत, याशिवाय २० जुलैच्या आसपास बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकल्यास उत्तरमध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, दक्षिण मध्य प्रदेश, पूर्व भारतातील काही भागांमध्ये पावसाची वाढ होणार आहे.’
दरम्यान, पुढील दोन दिवस राज्याच्या बहुतांश भागात कोरडे हवामान राहणार आहे. विदर्भाच्या काही भागात तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. सध्या उन्हाचा चटका जाणवत असून, कमाल तापमानात वाढ झाली आहे.













