Breaking News

मुणगे प्रकरणात अॅट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्याचा आरोप

अंकुश जाधव यांच्या भूमिकेवर सामाजिक संघटनांची टीका

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचा पाठिंबा नाही

कणकवली (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे येथे अणुऊर्जा प्रकल्पाच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या बॅनरवरून झालेल्या वादानंतर दाखल करण्यात आलेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्ग आणि मुणगे ग्रामस्थांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी मांडलेल्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदवला. या प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत, कोणावरही अन्यायाचे समर्थन नसले तरी कायद्याचा चुकीचा वापर समाजात जातीय तेढ निर्माण करू शकतो, असा इशारा यावेळी देण्यात आला.

कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्गचे कार्याध्यक्ष संदीप कदम, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव बोलत होते. यावेळी मुणगे गावचे प्रशासकीय उपसरपंच दशरथ मुणगेकर, खुडीचे सरपंच दीपक कदम, नगरसेवक लुकेश कांबळे, प्रकाश मुणगेकर, मनोहर मुणगेकर, देविदास मुणगेकर, बौद्धाचार्य ल. का. कदम, चंद्रकांत मुणगेकर यांच्यासह मुणगे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुजित जाधव यांनी सांगितले की, मुणगे येथे झालेल्या घटनेत मारहाण झाली असेल तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी, याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र, या घटनेत पुरेशा आधाराशिवाय अॅट्रॉसिटीचे कलम लावण्यात आले असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर करून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे नाव वापरण्यापूर्वी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याचा दावा करत, भविष्यात संस्थेचे नाव विनापरवानगी वापरल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

बुद्धिस्ट फेडरेशनचे कार्याध्यक्ष संदीप कदम यांनी सांगितले की, अणुऊर्जा प्रकल्पाच्या समर्थनार्थ निनावी बॅनर रात्रीच्या वेळी लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. ग्रामस्थांनी त्यास विरोध केल्यानंतर किरकोळ धक्काबुक्की झाली. मात्र, शेकडो लोकांनी मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ झाली किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करण्यात आला, हा दावा वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि सत्य समोर आणावे, अशी मागणीही त्यांनी केली.

मुणगेचे प्रशासकीय उपसरपंच दशरथ मुणगेकर यांनी सांगितले की, ग्रामसभेने अणुऊर्जा प्रकल्पाला विरोधाचा ठराव मंजूर केला असून गावात सामाजिक सलोखा कायम आहे. गावात जातीच्या आधारावर भेदभाव किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान होईल, अशी परिस्थिती कधीच नव्हती. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.

पत्रकार परिषदेत उपस्थितांनी अणुऊर्जा प्रकल्पाच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या निनावी बॅनरमागील सूत्रधारांचा शोध घेऊन संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणामागे राजकीय हेतू असल्याचाही आरोप करण्यात आला.

यावेळी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये ते नेहमीच पीडितांच्या पाठीशी उभे राहतील; मात्र अॅट्रॉसिटी कायद्याचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होऊ देणार नाहीत. तसेच मुणगे ग्रामस्थांच्या भूमिकेला पाठिंबा देत अणुऊर्जा प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या भावना शासनाने लक्षात घ्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली.