Breaking News

भाजी आणायला गेला अन् परतलाच नाही; तुंबलेल्या पाण्यात वैभववाडीच्या युवकाचा दुर्दैवी अंत

वैभववाडी (प्रतिनिधी) : मुंबई व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने वैभववाडी तालुक्यातील मांगवली येथील एका तरुण कुटुंबाचा आधार हिरावून घेतला आहे. नालासोपारा येथे राहणारा दिलीप राजाराम नारकर (वय २८) या युवकाचा तुंबलेल्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी (दि. ६) सायंकाळी भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडलेला दिलीप रात्री उशिरा नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात मृतावस्थेत आढळून आला.

दिलीप आणि त्याची पत्नी दीपाली नालासोपारा येथे भाड्याने राहत होते, तर त्याची आई गावी मांगवली येथे असते. सोमवारी मुसळधार पावसामुळे तो कामावर गेला नव्हता. सायंकाळी पाऊस थोडा ओसरल्याने तो भाजी आणायला गेला. मात्र, रात्री आठ वाजले तरी घरी परतला नाही. काळजीपोटी पत्नीने नातेवाईक व शेजाऱ्यांना सांगून शोध सुरू केला. अखेर रेल्वे स्थानकाजवळ रस्त्यावर साचलेल्या पाण्यात त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्याच्या पश्चात पत्नी, आई, दोन विवाहित बहिणी, असा परिवार आहे. पती घरी न परतल्याने पत्नी दीपाली आणि चुलत भावांनी रात्रभर शोध घेतला. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मंगळवारी रात्री नालासोपारा येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आले. कमावता तरुण मुलगा गमावल्याने नारकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मांगवली गावात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.