कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुका दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाच्यावतीने १९ जुलै रोजी कुडाळ येथील श्री देव कुडाळेश्वर ‘मंदिर येथे ‘माझा लोकराजा महोत्सव-२०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.
दशावतारातील ज्येष्ठ दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांच्या नावाने कुडाळ तालुका दशावतार संघटनेमार्फत हा महोत्सव आयोजित केला जातो. सुधीर कलिंगण यांनी दशावतार कलेत आपल्या अभिनयचातुर्याने आणि अभ्यासपूर्ण शैलीने अनेक भूमिका अजरामर केल्या. त्यांनी या आपल्या कला सादरीकरणाने आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या आठवणीप्रीत्यर्थ हा महोत्सव आयोजित करण्यात येत असतो. यावर्षी १९ जुलै रोजी हा महोत्सव होत आहे. यानिमित्त सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत बालकलाकारांचे स्पर्धात्मक सादरीकरण, सायं. ४.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन, ५. वाजता कुडाळ तालुक्यातील दशावतारी कलाकारांच्या शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत पाल्यांचा गुणगौरव, ६ वाजता तालुक्यातील ज्येष्ठ दशावतारी कलाकारांचा सन्मान, ७ वाजता सिंधुदुर्गातील दशावतार कलाकारांच्या संचात संयुक्त दशावतार नाटक ‘रामभक्त जांबुवंत’ आदी कार्यक्रम होणार आहेत. कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्हयातील दशावतारी कलाकार तसेच दशावतार कलाप्रेमींनी या महोत्सवाला उपस्थित राहवे, असे आवाहन तालुका दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाच्यावतीने करण्यात आले आहे.













