सावंतवाडीत १७ वर्षीय विद्यार्थ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
सुवर्ण कॉलनी परिसरातील घटना : उपचारादरम्यान मृत्यू
सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरातील सुवर्ण कॉलनी परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शिक्षण घेत असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घराच्या गॅलरीतून उडी मारून जीवनयात्रा संपवली. “मला आता पुढे शिकायचे नाही, माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये,” अशी चिठ्ठी लिहून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. काल घडलेल्या या घटनेत गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण स्थानिक महाविद्यालयात शिक्षण घेत होता. मंगळवारी त्याने अचानक आपल्या राहत्या घराच्या गॅलरीतून खाली उडी मारली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. मुलाने उडी मारल्याचे लक्षात येताच त्याच्या वडिलांनी प्रसंगावधान राखत तात्काळ ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुलाची अवस्था गंभीर असल्याने रुग्णवाहिकेची वाट न पाहता पोलिसांनी त्याला आपल्या शासकीय वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासणीत मुलाच्या पायाला फॅक्चर झाल्याचे निदान झाले, मात्र तो बेशुद्ध असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. पुढील उपचारासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला तात्काळ गोव्यातील बांबुळी गोवा मेडिकल कॉलेज येथे हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
आत्महत्येपूर्वी या मुलाने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये त्याने “मला आता पुढे शिकायचे नाही आणि माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये,” असे नमूद केले असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षणाच्या दडपणामुळे किंवा अन्य काही कारणास्तव त्याने हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी मृत मुलाच्या आई-वडिलांचा जबाब नोंदवून घेतला आहे. पालकांनी कोणाविरुद्धही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. एका हुशार आणि तरुण मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सुवर्ण कॉलनी आणि सावंतवाडी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.













