अस्मिता तळेकर यांच्या पाठपुराव्याला यश
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनंतर कामे पूर्ण
तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची गैरसोय याबाबत काही महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता तळेकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे लक्ष वेधले होते. बसस्थानकात दररोज मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करत असल्याने या मूलभूत सुविधांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली होती.
या समस्येची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने सिंधुदुर्ग विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. तसेच आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यापूर्वी तळेरे बसस्थानकातील प्रलंबित कामे मार्गी लागली पाहिजेत, अशा सक्त सूचनाही दिल्या होत्या.
दरम्यान, अस्मिता तळेकर यांनीही संबंधित विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र, सुरुवातीला या समस्येकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून अपेक्षित गांभीर्याने पाहिले गेले नाही. अखेर तळेकर यांनी पुन्हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन तळेरे बसस्थानकातील स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येची सविस्तर माहिती दिली. यानंतर संबंधित यंत्रणेने तातडीने कार्यवाही करत तळेरे बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरुस्ती तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून गैरसोयीचा सामना करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तळेरे बसस्थानकातील मूलभूत सुविधा सुधारल्याबद्दल प्रवासी आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, अस्मिता तळेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचेही कौतुक केले जात आहे.
स्वच्छतागृहाची स्वच्छता राखण्याची जबाबदारीही महत्त्वाची
गेली अनेक वर्षे तळेरे बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली होती. अस्मिता तळेकर यांनी या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर आता या स्वच्छतागृहाची नव्याने दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना स्वच्छ व सुविधायुक्त शौचालयाची सुविधा उपलब्ध झाली आहे. मात्र, ही सुविधा कायमस्वरूपी चांगल्या स्थितीत राहण्यासाठी प्रवाशांनीही जबाबदारीने स्वच्छता राखणे गरजेचे आहे. त्याचबरोबर संबंधित यंत्रणेने या ठिकाणी नियमित स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून शौचालयाची सातत्याने देखभाल करणे आवश्यक आहे.













