Breaking News

कोकणरेल्वेला मुसळधार पावसाचा फटका

कोकण रेल्वेची वाहतूक तीन ते साडेतीन तास उशिराने

कणकवली (प्रतिनिधी) : कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता कोकण रेल्वे वाहतुकीवरही दिसून येत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक गाड्या तीन ते साडेतीन तास उशिराने धावत असून रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये रविवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांवर झाला. त्यात कोकण रेल्वे मार्गावरील अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पुणे-एर्नाकुलम विशेष एक्सप्रेस सुमारे ३ तास ३१ मिनिटे, कोकणकन्या एक्सप्रेस ३ तास ३२ मिनिटे, मंगळूर एक्सप्रेस ३ तास ३९ मिनिटे, तर तुतारी एक्सप्रेस १ तास ५३ मिनिटे उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती. तसेच खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासन सतर्क झाले होते. सध्या कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू असली तरी ती धीम्या गतीने सुरू असून अनेक गाड्या अद्याप तीन ते साडेतीन तास उशिराने धावत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे सेवांवर आणखी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.