“वाचनसंस्कृतीच माणसाला घडवते” – गोपुरी आश्रमात दिनेश राणे यांचा गौरव

कणकवली (प्रतिनिधी) : गोपुरी आश्रमाच्या वतीने मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या संचालक मंडळावर निवड झालेल्या दिनेश राणे यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास अभ्यासक तथा सेवानिवृत्त शिक्षक जी. ए. सावंत यांच्या हस्ते राणे यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना जी. ए. सावंत यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. जीवनात येणाऱ्या विविध अडचणी, संघर्ष आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी पुस्तके माणसाला योग्य दिशा देतात, असे त्यांनी सांगितले. मराठी भाषेचा समृद्ध वारसा लक्षात घेता तिचे अस्तित्व अबाधित राहील, मात्र तिच्या जतनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सध्याच्या आधुनिक युगात वाचनसंस्कृती कमी होत चालल्याची खंत व्यक्त करत त्यांनी समाजातील सजग नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तसेच इंग्रजी भाषा शिकणे आवश्यक असले तरी दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिनेश राणे यांनी आपल्या मनोगतात वाचनसंस्कृती टिकवण्यावर भर दिला. नव्या पिढीला वाचनाची सवय लावण्यासाठी डिजिटल माध्यमांचा उपयोग करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पुस्तके ही केवळ ज्ञानाचे साधन नसून व्यक्तिमत्त्व घडवणारी शक्ती असल्यामुळे युवकांनी सोशल मीडियापेक्षा पुस्तकांना अधिक महत्त्व द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला डी. पी. तानवडे, विलास गुडेकर, अ‍ॅड. मनोज रावराणे, सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक सापळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेंद्र मुंबरकर यांनी केले.