सर्वोदय नगरात बिबट्याचा थरार! ; कुत्र्याला केले फस्त, नागरिक दहशतीत

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरातील सर्वोदय नगर कॉलनीत काल मध्यरात्री अक्षरशः थरार उडाला! दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका घराच्या कुंपणात शिरकाव करत क्षणात कुत्र्यावर झडप घातली आणि त्याला फस्त करून जंगलाच्या दिशेने पळ काढला. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, या घटनेनंतर परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.

मध्यरात्रीचा थरार… क्षणात हल्ला!

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा सर्वोदय नगरमधील एका घरासमोरील कुंपण ओलांडून बिबट्या आत शिरला. काही क्षण दबा धरून बसल्यानंतर त्याने विजेच्या चपळाईने कुत्र्यावर झडप घातली. कुत्र्याला जबड्यात पकडून तो जंगलाच्या दिशेने पसार झाला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “बिबट्या इतक्या जवळ येतोय, म्हणजे आता माणसांनाही धोका निर्माण होऊ शकतो,” अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली.

प्रशासनावर संतापाचा भडका!

घटनेनंतर कॉलनीतील नागरिकांनी वनविभाग आणि नगरपालिकेवर जोरदार टीका केली आहे. परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याबाबत अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असा आरोप रहिवाशांनी केला. “वनविभाग व नगरपालिकेने जे काम करायला हवे होते, ते बिबट्याने केले!” भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळेच बिबट्या मानवी वस्तीकडे आकर्षित होत असल्याचे मतही स्थानिकांनी मांडले.

नागरिकांच्या ठाम मागण्या –

परिसरात तातडीने पिंजरा लावावा.

रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी.

रस्त्यांवरील पथदिवे तात्काळ दुरुस्त करावेत.
नागरिकांसाठी जनजागृती मोहीम राबवावी.
वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, रात्री उशिरा घराबाहेर न पडण्याचा आणि लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, सर्वोदय नगरात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे. सर्वोदय नगरातला हा ‘बिबट्या थरार’ आता प्रशासनासाठी मोठी कसोटी ठरणार आहे!