आचरा-कणकवली मार्गावर डंपर पलटी ; दोन तास वाहतूक ठप्प

श्रावण नदीवाडी येथे अपघात; चालकासह पाच जण किरकोळ जखमी, मोठा अनर्थ टळला

कणकवली (प्रतिनिधी) : आचरा-कणकवली मार्गावर श्रावण नदीवाडी येथे चिरे वाहतूक करणारा डंपर पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात डंपरमधील चिरे रस्त्यावर पसरल्यामुळे सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली. चालकासह पाच जण किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवळे येथून ओरोसकडे चिरे घेऊन डंपर निघाला होता. डंपर चालक ईजार अन्सारी (वय २०, रा. झारखंड) हा वाहन चालवत होता. डंपर श्रावण-रामगड सीमेवरील श्रावण नदीवाडी येथे आला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि डंपर रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात चालकासह चार कामगार जखमी झाले. सर्व जखमींना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघातात डंपरचे मोठे नुकसान झाले आहे. डंपर पलटी झाल्यानंतर त्यातील चिरे संपूर्ण रस्त्यावर पसरल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद ठेवावी लागली. सुदैवाने त्या वेळी समोरून किंवा मागून अन्य कोणतेही वाहन आले नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावर पडलेले चिरे बाजूला करण्यात आले आणि सुमारे दोन तासांनी वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.