कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीहून तळेरेच्या दिशेने जात असलेल्या कारला समोरून येणाऱ्या दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास जाणवली गावठणवाडी बस थांब्यानजिक घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कणकवलीहून तळेरेच्या दिशेने कार जात असताना जाणवली गावठणवाडी येथे समोरून कणकवलीच्या दिशेने येणारा दुचाकीस्वार भरधाव वेगात मोबाईलवर बोलत होता. यावेळी त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी कारच्या डाव्या बाजूस जाऊन आदळली.
या अपघातात दुचाकी व कारचे नुकसान झाले असून दुचाकीस्वार जखमी झाला. जखमीला तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई केली.












