सावंतवाडी पोलिस ठाण्यात महिला दिन उत्साहात

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी पोलिस ठाण्यात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोनी साटम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. महिला पोलिस ठाणे ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली. यावेळी नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील उपस्थित होत्या.

सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या प्रांगणात महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी कार्यभार सांभाळला. तसेच ट्रॅफिक, 112, ठाणे अंमलदार, वायरलेस तसेच चेकपोस्ट व चालक म्हणून महिलांनी ड्यूटी बजावली. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. दहीकर म्हणाले, सर्वच क्षेत्रात महिलांचा पुढाकार राहीला आहे. आज महिला दिनाच्या निमित्ताने महिला पोलिस ठाणे ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली गेल्याचे उद्गार त्यांनी काढले. तर अप्पर पोलीस अधीक्षक नयोनी साटम म्हणाल्या, महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. आजचा दिवस महिलांचा असून दिवसरात्र याची तमा न बाळगता सेवा देणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला.

दरम्यान, नवोदय विद्यालयातील किशोरवयीन मुलींना यावेळी स्वसंरक्षणपर तसेच महिला मुली विषयक कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या मुलींचा सन्मान करण्यात आला. पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधिक्षक नयोनी साटम, उप विभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलिस उप अधिक्षक गृह श्वेता खाडे, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, जयेश खंदरकर, आजच्या पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी महिला पोलिस उप निरीक्षक माधुरी मुळीक आदींसह महिला पोलिस, पोलिस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सकाळी ०९.३० ते ११.१५ पर्यंत सुमारे २०० किशोरवयीन मुलींना पोलीस ठाणे चे प्रत्यक्ष कामकाजाची माहिती प्रत्येक दालन दाखवून देण्यात आली. त्यांच्यासाठी विविध ऍक्टिव्हिटी गेम्स माध्यमातून भरोसा सेलच्या प्रभारी अधिकारी श्रीमती नलिनी शिंदे यांनी मनोरंजनासह विद्यार्थिनींचे शाळा, पोलीस ठाणे बाबतीत मत, महिलांच्या शक्ती, कर्तृत्व, उन्नती याबाबतचे विविध पैलू संवादात्मक स्वरूपात मांडले. मुलींनी यामध्ये उस्फुर्त सहभाग नोंदविला. ११.३० ते १२.३० या वेळेत पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी विद्यार्थिनी व उपस्थित नागरिक, पत्रकार, पोलीस यांच्याशी संवाद साधला. महिलांच्या कर्तुत्वाबाबतचे विविध पैलू तसेच पोलिसांच्या दैनंदिन कामकाजामध्ये गुन्हेगारी संबंधित कार्याव्यतिरिक्त इतर समाजाचे पोलिसांशी संबंधित असणारे अन्य विभाग – वाहतूक, पासपोर्ट, चालवर्तन पडताळणी निमित्ताने लोकांशी होणारे मदतीचे कार्य याबाबत विद्यार्थिनींशी गप्पांच्या स्वरूपात हितगुज केले. सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन राष्ट्रगीत व राज्य गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला पोलीस हवालदार श्रीमती ज्योती दुधवडकर यांनी व प्रास्ताविक आणि आभार प्रभारी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी केले. महिला पोलीस ठाणे निमित्त काढलेली रांगोळी व केलेला सेल्फी पॉइंट हे विद्यार्थिनी व नागरिकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते. विविध नागरिक महिला व विद्यार्थिनींनी या ठिकाणी सेल्फी काढून आनंद व्यक्त केला.