सावंतवाडीत ‘मालवणी करंडक’ एकांकिका स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन
सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा ही कला आणि साहित्याची पंढरी असून येथील नाट्य संस्कृती जोपासण्यासाठी जिल्ह्यात एक सुसज्ज ‘नाट्य केंद्र’ उभे राहावे यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या प्रयत्नांना यश येत असून, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी यावर्षीचा जिल्हा नाट्य महोत्सव वेंगुर्ल्यात आयोजित करण्यास हिरवा कंदील दिला आहे, अशी महत्त्वाची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी येथे दिली.
सावंतवाडी नगर परिषद, ओंकार कला मंच आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मालवणी करंडक’ एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन श्री. दळवी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
संस्कृतीचा वारसा टिकवणे आपले कर्तव्य
यावेळी बोलताना मनीष दळवी म्हणाले की, “आजच्या डिजिटल युगात पुढच्या पिढीला आपली मूळ संस्कृती आणि मालवणी भाषेचा वारसा समजावून सांगणे हे आपले कर्तव्य आहे. सावंतवाडीने शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव नेहमीच उज्ज्वल केले आहे. मालवणी भाषेतील गोडवा आणि नाट्य संस्कृतीचा दर्जा टिकवण्यासाठी ‘मालवणी करंडक’ सारखे महोत्सव अत्यंत महत्त्वाचे आहेत. भविष्यात अशा सांस्कृतिक महोत्सवांचे केंद्रबिंदू सावंतवाडीच राहावे, यासाठी आमचे प्रयत्न राहतील.”
नाट्य केंद्राची मागणी
मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर यांनी यावेळी बोलताना, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाट्य चळवळ अधिक जोमाने वाढण्यासाठी जिल्ह्यात हक्काचे ‘नाट्य केंद्र’ उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली. या सोहळ्याला महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, सभापती आनंद नेवगी, दिपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, महोत्सव समितीचे अध्यक्ष अमोल टेंबकर, उपाध्यक्ष तथा पाटणकर एज्युकेशन ट्रस्टचे संचालक अॅड. रूजूल पाटणकर, मालवणी कवी दादा मडकईकर, नगरसेवक सुकन्या टोपले, नीलम नाईक, सुनीता पेडणेकर, सिद्धार्थ भांबूरे, सतीश पाटणकर, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सचिव संतोष सावंत, तालुकापत्रकार संघाचे सचिव विनायक गावस आदी उपस्थित होते.
कलाकारांचा सन्मान
या कार्यक्रमाचे औचित्य साधून मालवणी रील स्टार गौरी बांदेकर, पद्मा वेंगुर्लेकर, भारती परब, मालवणी कवी रामदास पारकर, जादूगार वैभव कुमार, ज्येष्ठ नाट्य कलाकार कल्पना बांदेकर आणि माजी नगरसेवक संजय पेडणेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अॅड. रुजूल पाटणकर यांनी प्रास्ताविक करताना, नवीन कलाकार घडवण्यासाठी हे व्यासपीठ पुन्हा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. स्वागत समितीचे अध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडीच्या सांस्कृतिक भूमिकेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले, तर आभार अमोल टेंबकर यांनी मानले. या कार्यक्रमाला सचिव भुवन नाईक, सहसचिव सचिन मोरजकर, खजिनदार श्रेयस मुंज यांच्यासह ओंकार कला मंचचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.












