सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षकांच्या एकजुटीचा नवा अध्याय
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : वाढती अशैक्षणिक कामे, ऑनलाइन कामांचा बोजा आणि रिक्त पदांमुळे शिक्षकांसमोर आव्हाने वाढली असताना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रमुख शिक्षक संघटनांनी मतभेद बाजूला सारून एकत्र येत इतिहास घडवला आहे. जिल्ह्यात प्रथमच ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, शाखा सिंधुदुर्ग’ची अधिकृत स्थापना करण्यात आली असून, यामुळे हजारो शिक्षकांना हक्काचे आणि सक्षम व्यासपीठ मिळाले आहे.
नुकत्याच झालेल्या एका ऐतिहासिक बैठकीत या नव्या जिल्हा शाखेची अधिकृत कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. यात जिल्हाध्यक्षपदी अभ्यासू व तडफदार नेतृत्व श्री. संतोष पाताडे तर जिल्हा सचिवपदी प्रशासकीय जाण असलेले श्री. लक्ष्मण वळवी यांची एकमताने निवड करण्यात आली. याशिवाय कार्याध्यक्षपदी श्री. सुहास सावंत व श्री. विनायक हरकुळकर, कोषाध्यक्षपदी श्री. सचिन जाधव, सहसचिवपदी श्री. गणेश नाईक, प्रसिद्धीप्रमुखपदी श्री. अमित ठाकूर तर सल्लागार म्हणून श्री. म. ल. देसाई व श्री. ए. डी. राणे यांची निवड झाली आहे.
या बैठकीला जिल्ह्यातील पुरोगामी शिक्षक समिती, अखिल भारतीय शिक्षक संघ, जुनी पेन्शन संघटना, मुख्याध्यापक महासंघ, कस्ट्राईब, बहुजन, सत्यशोधक व उर्दू शिक्षक संघटनेसह अनेक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“संघर्षासाठी एकजूट, शिक्षणासाठी बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कटिबद्धता” हे ब्रीद घेऊन ही संघटना यापुढे अशैक्षणिक कामे, प्रलंबित पदोन्नती, वेतन-निवृत्तीवेतन आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान यांसारख्या गंभीर प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवणार आहे. “एक शिक्षक – एक आवाज” ही भावना घेऊन सुरू झालेली ही चळवळ सिंधुदुर्गच्या शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा देईल, असा विश्वास उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केला.













