मसुरे (प्रतिनिधी) : सृष्टीने धारण केलेले रौद्ररूप… मुसळधार कोसळणारा पाऊस आणि सोसाट्याचा वारा… समोर अथांग पसरलेला काळोख आणि गडनदीच्या पात्रातून ओसंडून वाहणारे पुराचे पाणी! अशा अत्यंत भयानक आणि मृत्यूच्या दारात उभ्या ठाकलेल्या परिस्थितीतून केवळ अफाट जिद्द, मानसिक धैर्य आणि दैव बलवत्तर म्हणून मसुरे कावावाडी येथील वेदांत विजय हडकर हा युवक मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडला आहे.
बांदिवडे – भगवंतगड कॉजवेवर रविवारी रात्री घडलेला हा थरार अंगावर काटा आणणारा असून, मानवी जिद्द आणि गावकऱ्यांच्या समयसूचकतेचे एक जिवंत उदाहरण ठरला आहे.
वाढत्या पाण्याचा अंदाज चुकला आणि…
आचरा विद्यालयात शिक्षण घेणारा वेदांत रविवारी रात्री ८ च्या सुमारास आचऱ्याहून आपल्या मसुरे गावाकडे येण्यास निघाला. दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बांदिवडे-भगवंतगड यांना जोडणाऱ्या गडनदीवरील कॉजवेवर पाणी चढले होते. संपूर्ण परिसरात रात्रीचा मिट्ट काळोख होता. घरी पोहोचण्याच्या ओढीने वेदांतने त्या वाहत्या पाण्यातूनच आपली मोटरसायकल पुढे काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज न आल्याने, तसेच या कॉजवेला संरक्षक कठडा नसल्यामुळे, घात झाला! तो आपल्या मोपेडसह थेट गडनदीच्या अथांग आणि वेगवान पात्रात फेकला गेला.
काळोखात मृत्यूशी झुंज-
नदीच्या पात्रात पडताच क्षणार्धात सर्व काही संपल्यासारखे झाले होते. बाजूला कोणीही नव्हते, मदतीसाठी हाक मारली तरी ऐकणारं कोणी नव्हतं. अशा स्थितीत गांगरून न जाता वेदांतने कमालीचा धीरोदात्तपणा दाखवला. एका बाजूला पुराचा वेगवान प्रवाह त्याला वाहून नेण्याचा प्रयत्न करत होता, तर दुसऱ्या बाजूला तो जगण्याची लढाई लढत होता. अखेर, पाण्याच्या प्रवाहाशी कसाबसा लढा देत, पोहत त्याने नदीचा किनारा गाठला. मृत्यूला अत्यंत जवळून हुलकावणी देत तो किनाऱ्यावर तर पोहोचला, पण भीती आणि थंडीने तो पूर्णपणे गारठून गेला होता.
गावकऱ्यांच्या रूपाने धावून आले ‘देवदूत’-
याच दरम्यान, कॉजवेच्या बांदिवडे किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या मुरली चिंदरकर यांच्या नजरेस हा प्रकार आला. त्यानी क्षणभरही विलंब न करता भगवंतगड येथील माजी ग्रा सदस्य पप्पू परुळेकर आणि स्थानिक ग्रामस्थांना या घटनेची कल्पना दिली. माहिती मिळताच पपू परुळेकर, सागर परुळेकर, प्रकाश परुळेकर, केदार परुळेकर, कवींद्र माळगावकर, राजेश पालकर, अर्जुन परुळेकर यानी कसलाही विचार न करता, कोसळत्या पावसात तात्काळ भगवंतगड बाजूने धाव घेतली.
शोध घेत असताना वेदांत रस्ता लगत अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत, पूर्णपणे भिजून रस्त्याच्या कडेला बसलेला दिसून आला. गावकऱ्यांनी त्याला मायेने जवळ केले, धीर दिला आणि त्याची विचारपूस केली. कॉजवेवरून अजूनही पाण्याचा प्रवाह वाहतच होता, पण गावकऱ्यांनी त्याला धीर देत अत्यंत काळजीपूर्वक चालत पलीकडच्या बाजूला म्हणजेच बांदिवडे येथे आणले आणि सुरक्षितपणे त्याच्या घरी पोहोचवले.
सोमवारी ग्रामस्थांनी काढली गाडी बाहेर-
वेदांत सुरक्षित असला तरी त्याची मोपेड स्कुटी नदीच्या पात्रातच अडकली होती. सोमवारी सकाळी पाऊस थोडा ओसरल्यावर मसूरे भगवंतगड आणि बांदिवडे येथील ग्रामस्थांनी होडीच्या साहाय्याने अथक परिश्रम घेत नदीच्या पात्रातून ही मोटरसायकल सुखरूप बाहेर काढली. यावेळी अलंकार मुणगेकर, सुमेध मसुरकर, हरी आचरेकर, सिद्धेश गिरकर, अनिकेत चव्हाण, विनायक आचरेकर, सागर परुळेकर, नारायण गिरकर, सूरज मसुरकर, सुमित पवार आदी युवक सहभागी झाले होते.













