Breaking News

अणुऊर्जा प्रकल्पावर सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी; राणे पिता-पुत्रांच्या वक्तव्यांत विसंगती : सुशांत नाईक

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, राज्य सरकारने याबाबत आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली.

देवगड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नाईक म्हणाले की, खासदार नारायण राणे यांनी अणुऊर्जा प्रकल्पाला उघडपणे पाठिंबा दर्शविला आहे, तर पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रकल्पाबाबत माहिती नसल्याचे सांगितले. राज्य सरकारने या प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार (एमओयू) केल्याचा दावा करत संबंधित कागदपत्रे आणि छायाचित्रेही यावेळी सादर करण्यात आली.
सर्वेक्षण प्रक्रिया सुरू असतानाही पालकमंत्र्यांनी माहिती नसल्याचे सांगणे म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. स्थानिक जनतेचा वाढता विरोध लक्षात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी भूमिका बदलल्याची टीकाही त्यांनी केली.
अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिक जनता रस्त्यावर उतरल्यास शिवसेना त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहील, असा निर्धार व्यक्त करत नाईक म्हणाले की, कोकणातील पर्यावरण आणि जैवविविधतेला धोका निर्माण करणारे प्रकल्प नकोत. त्याऐवजी आंबा, काजू प्रक्रिया उद्योग, संशोधन केंद्रे आणि स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योग उभारण्यास प्राधान्य द्यावे.
यावेळी ३ जुलै रोजी आंबा बागायतदारांनी जाहीर केलेल्या जलसमाधी आंदोलनाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना वेळेत योग्य नुकसानभरपाई मिळाली असती, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पुन्हा सिंधुदुर्गात येण्याची वेळ आली नसती, असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, दादा सावंत, तुषार धुरी, गुरुनाथ धुवाळी, विकास कोयंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.