मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारांचा पाऊस पडल्याची घटना ताजी असतानाच मालवण तालुक्यातील देवली गावातील खालची परबवाडी या ठिकाणी विजय मधुकर देऊळकर यांच्या घरावर जवळपास 5 किलो वजनाचा बर्फाचा तुकडा पडला आहे. त्यामुळे आता एका नव्या घटनेमुळं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. बर्फाचा तुकडा इतका मोठा होता की, घराच्या छपरावरील कवलेही तुटली आहेत. या घटनेमुळं या गावात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवली गावचे सरपंच शाम वाककर यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि देऊलकर कुटुंबीयांशी चर्चा केली. तसेच याबाबत प्रशासनाला माहिती देऊन घटनेच्या शास्त्रीय कारणांचा शोध घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दुपारी अर्चना विजय देऊलकर या घरात असताना स्वयंपाक घरात मोठा आवाज झाला. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एक बर्फाचा मोठा तुकडा घरावर कोसळला असल्याचं त्यांनी पाहिलं. दरम्य देऊलकर यांचे घर गावाच्या मध्यभागी आहे. त्यांच्या घरावर अचानक बर्फाचा तुकडा पडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण किंवा पावसाचा कोणताही अंदाज नसताना भर उन्हात बर्फाचा तुकडा पडला. त्यामुळे देवली गावात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बर्फाच्या तुकड्याचे नमुने देऊलकर यांनी संशोधनासाठी फ्रिजमध्ये ठेवले आहेत. जेणेकरून हा बर्फ गारांच्या स्वरूपात पडला आहे की यामागे अन्य काही कारण आहे? याची माहिती समोर येईल.












