चांदोशी तिठ्यावर अर्धवट रस्ता; बॅरिगेट्स नसल्याने अपघात – नागरिकांमध्ये संताप

नांदगाव (स्वप्निल तांबे) : देवगड-नांदगाव मार्गावर चांदोशी तिठ्या नजीक सध्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून, या ठिकाणी मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. देवगडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचे काम काही फूट आधीच थांबवण्यात आले असून रस्त्याची कडा तशीच उघडी ठेवण्यात आली आहे.

यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी एक दांपत्य आपल्या लहान मुलासह मोटारसायकलवरून जात असताना याच ठिकाणी अपघात झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, या धोकादायक ठिकाणी कोणतेही बॅरिगेट्स किंवा सूचनाफलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

अर्धवट सोडलेल्या रस्त्याच्या कामाला जबाबदार कोण? असा सवाल नागरिक विचारत आहेत. तत्काळ सुरक्षिततेची उपाययोजना करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

दरम्यान, वाहनचालकांनी या मार्गावरून जाताना विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.