अपूर्ण कामामुळे नागरिक आणि प्रवाशांचा जीव धोक्यात
कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर अपूर्ण काम आणि अरुंद रस्त्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. आज पहाटे ६.४५ वाजण्याच्या सुमारास वेताळ बांबर्डे पूल येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी एक कार रस्त्याच्या कडेला कोसळून भीषण अपघात झाला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कारचालक मुंबईहून गोव्याकडे जात होता. वेताळ बांबर्डे पुलानजीक महामार्गाचे काम अर्धवट असल्याने रस्ता अचानक अरुंद होतो. पहाटेच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या खाली कोसळली.
वेताळ बांबर्डे येथील गोडकर कुटुंबाच्या घरासमोर महामार्गाचा भाग अत्यंत अरुंद आहे. यापूर्वीही याच ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. स्थानिक रहिवासी आणि गोडकर कुटुंबीयांनी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. “महामार्गाचे हे अर्धवट काम आमच्या जीवावर उठले आहे. सतत होणाऱ्या अपघातांमुळं आम्ही आजही भीतीखाली वावरत आहोत,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे आता तरी संबंधित प्रशासन सार्वजनिक बांधकाम जागे होणार का? आणि या धोकादायक वळणावर उपाययोजना करणार का? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.













