शालेय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर डॉक्टरच्या कानशिलात लगावली ; वैभववाडीत तणाव

ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांची तोडफोड

वैभववाडी (प्रतिनिधी) : आठ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण करत रुग्णालयाच्या काचा फोडल्या. ही घटना वैभववाडी रुग्णालयात घडली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरिक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

कोकीसरे नारकरवाडी येथील शिवांश तानवडे वय 9 हा मुलगा आजारी असल्याने नातेवाईकांनी त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात, रविवारी सायंकाळी दाखल केले. दाखल करण्यापूर्वी त्याची प्रकृती चिंताजनक होती. वैद्यकीय अधिकारी श्री मोरे यांनी काही वेळातच मुलगा मयत झाल्याचे नातेवाईकांना सांगितले. मुलाच्या वडिलांचा राग अनावर आल्याने त्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे यांच्या कानशिलात लगावली व रुग्णालयाच्या दरवाजाच्या काचा त्यांनी फोडल्या. या घटनेची माहिती मिळताच इतर नातेवाईकांनी व नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. पोलिसी घटनास्थळी दाखल झाले. उशिरापर्यंत नातेवाईकांवर गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता. घटनास्थळी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर तसेच पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत.