सिंधूदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सन २०२६ पिंक हंगामामध्ये जिल्ह्यातील अवकाळी पाऊस दाटधुके आणि खार/दवा इ. हवामानीय बदलामुळे यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक असून नेहमी शेतकऱ्यांसोबत राहिलेली आहे. शेतकऱ्यांचे हित जाणून जिल्हा बँकेने चालू वर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा, काजू पीक शेतकरी कर्जदारांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने चालू पीक हंगामामध्ये (सन २०२५-२६) ज्या शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सहकारी संस्थामार्फत किंवा बँकेकडून थेट स्वरूपात बागायती पीक कर्ज उचल केलेली आहे अशा शेतकऱ्यांना त्यांचे कर्जाची संस्थेकडे अथवा बँकेकडे दि. ३० जून २०२६ पर्यंत नियमित कर्ज फेड केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जासाठी लागू असलेल्या नियमित कर्ज व्याज दरामध्ये बँक आपल्या नफ्यातून अतिरिक्त २% व्याज सवलत देणार आहे. असा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ बैठकित घेण्यात आल्याची माहीती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
कर्ज २५हजाराने वाढवण्यात येणार आहे. आंबा पिकासाठी प्रति हेक्टरी मर्यादा रु.२,२५,०००/- असून ती मर्यादा सन २०२६-२७ करिता रू २.७५,०००/- इतकी रहाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आंबा पीक उत्पादन घेण्यासाठी गतवर्षीपेक्षा रू. ५०,०००/- प्रति हेक्टर याप्रमाणे अतिरिक्त कर्ज उपलब्ध होणार आहे. काजू पिकासाठी प्रति हेक्टरी मर्यादा रु.१,७५,०००/- असून सदर मर्यादा रु.२,००,०००/- केल्यामुळे प्रत्येक हेक्टरी रु.२५,०००/- याप्रमाणे कर्जात अतिरिक्त वाढ होणार आहे.
वरील पीक कर्जासाठी शेतक-यांनी रु.३.०० लाख कर्ज मर्यादेपर्यंत कर्ज नियमित व मुदतीत परतफेड केल्यास त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी ३% प्रमाणे एकुण ६% व्याजाचा लाभ होऊन शेतकऱ्यांना सदर कर्ज ०% व्याजदराने उपलब्ध होणार आहे. तरी जिल्हा बँकेने आंबा, काजू पीक कर्जावरील या आंबा, काजू पीक कर्जासाठी २% व्याज सवलत लागू केलेली असुन या संधीचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले आहे.












