सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरातील विविध ‘जीव्हीपी’ अर्थात कचरा प्रवण क्षेत्र ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन आरोग्य विभागाने थेट त्यांच्या घरी पोहोचून दंडात्मक कारवाई केली आहे. या धडक मोहिमेमुळे कचरा टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोठावळे पाणंद, भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय वसतीगृह परिसर आणि महादेव भाटले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने या कचऱ्याची सूक्ष्म तपासणी केली असता, त्यामध्ये काही नागरिकांची नावे आणि पत्त्यांचे पुरावे मिळून आले. या पुराव्यांच्या आधारे प्रशासनाने संबंधित नागरिकांची चौकशी केली असता त्यांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याचे निष्पन्न झाले.
नगरपरिषदेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित नागरिकांना प्रत्येकी २००/- रुपये स्पॉट फाईन आकारण्यात आला आहे. शहरात अशा प्रकारची कारवाई आता दररोज केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी शहराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी कचरा उघड्यावर टाकू नका. ओला व सुका कचरा वेगवेगळा करूनच नगरपरिषदेच्या घंटागाडीकडे सुपूर्द करावा, नियम न पाळणाऱ्यांवर यापुढेही कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.












