बलात्कारसह पोक्सो च्या गुन्ह्यात 20 वर्षे जेलसह 30 हजारांचा दंड

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील अकरावी मध्ये शिकत असलेल्या सुमारे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत व्हॉट्सॲप द्वारे ओळख निर्माण करून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मालवण तालुक्यातील वडाचापाट गावातील आरोपी अमृत उर्फ केतन सखाराम पालव याला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी बलात्कारासह पोक्सो च्या गुन्ह्यात २० वर्षे सश्रम कारावास आणि ३० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद करत आरोपीचा गुन्हा सिद्ध केला.

आरोपी अमृत पालव याने पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही २०२० मध्ये व्हॉट्सअँप द्वारे पीडितेशी ओळख निर्माण करून मैत्रीचे संबंध निर्माण केले होते. मार्च 2020 मध्ये आरोपी अमृत याने पीडितेला काजूच्या बागेत बोलवून तिच्यावर जबरदस्तीने तीनवेळा लैंगिक अत्याचार केला होता. यातून ती मुलगी गर्भवती राहिली होती. त्यानंतर आरोपीने पीडितेशी बोलणे टाळले. त्यामुळे २३ जानेवारी २०२१ रोजी अमृत याच्या विरोधात मालवण पोलीस ठाण्यात भा. द. वी कलम ३७६(१), ३७६(२)(एन) सह पोक्सो कायदा ४,६,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा यशस्वी तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील यांनी केला होता या खटल्यात पीडित युवती, तिचे वडील, आत्या, पंच, पोलीस कर्मचारी तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील, जन्म मृत्यू निबंधक, वैद्यकीय अधिकारी कपिल मेस्त्री व उल्हास लोखंडे असे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडितेची साक्ष आणि वैद्यकीय अहवाल महत्वाचा ठरला. सरकारी वकिल रुपेश देसाई यांनी केलेला यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी अमृत याला पोक्सो कायदा कलम ४ अन्वये १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार दंड, तसेच पोक्सो कायदा कलम ६ अन्वये २० वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.