​ प्लास्टिकचा हादैत्य मातला, बंदीत केले देह मानवाचा’ -चिंदर सडेवाडी येथील चिमुकल्याच्या कलाकृतीतून पर्यावरणाचा एल्गार…!​

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी-गोसावीवाडीतील एका शालेय विद्यार्थ्याने ‘प्लास्टिक’ रुपी राक्षसाची (दैत्याची) कलाकृती सादर करून नागरिकांचे लक्ष वेधले. “प्लास्टिकचा हा दैत्य मातला, बंदीत केले देह मानवाचा,” हा ज्वलंत संदेश देत या चिमुकल्या कलाकाराने पर्यावरणाच्या गंभीर समस्येवर प्रकाश टाकला आहे.

जुने साहित्य, नवा संदेश

कु. विनय रामदास गोसावी ​या विद्यार्थ्याने टाकून दिलेल्या कार्डबोर्ड, कागद, आणि जुन्या प्लस्टिक बॉटल या साहित्याचा उपयोग करून हा सुमारे दोन फूट उंचीचा ‘प्लास्टिक दैत्य’ तयार केला आहे. या राक्षसाच्या क्रूर चेहऱ्यावरून आणि हातात असलेल्या दंडावरून प्लास्टिकमुळे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम स्पष्टपणे दिसत होते.

मानवी देहाला प्लास्टिकचे बंधन

​या अनोख्या कलाकृतीमागील संदेश स्पष्ट आहे. एकेकाळी सोयीसाठी वापरले जाणारे प्लास्टिक आज इतके माजले आहे की, त्याचे कण (Microplastics) आपल्या अन्नातून, पाण्यातून आणि हवेतून मानवी शरीरात प्रवेश करत आहेत. यामुळे, प्लास्टिकने आपल्या देहालाच बंदी बनवले आहे, हे वास्तव या उपक्रमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले.

​जागरूकतेची गरज

“प्लास्टिकने पृथ्वीला जणू विळखाच घातला आहे. या चिमुकल्या कलाकाराने जुन्या साहित्यातून इतकी बोलकी कलाकृती बनवणे, हे दर्शवते की, या समस्येची जाणीव आता लहान मुलांनाही झाली आहे. नागरिकांनी सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवण्याची हीच योग्य वेळ आहे.”

​पर्यावरण वाचवा, प्लास्टिकला कायमचा ‘रामराम’ म्हणा

​हा दैत्य केवळ कलाकृतीपुरता मर्यादित न ठेवता, लोकांनी आपल्या जीवनातून प्लास्टिकचा वापर हद्दपार करण्याची प्रतिज्ञा घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.