खारेपाटण हायस्कूल मध्ये महाराष्ट्र राज्य व कामगार दिन उत्साहात साजरा

शाळेच्या स्वच्छता महिला कर्मचारी श्रीम.सुशिला कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : “कष्टकरी हाच समाजाचा खरा कणा आहे,” हा संदेश देत खारेपाटण हायस्कूल येथे १ मे ‘महाराष्ट्र राज्य दिन’ आणि ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.तर यावर्षी हायस्कूल मधील महिला स्वच्छता कर्मचारी श्रीम. सुशीला सुरेश कांबळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून श्रमाचा आणि कामगारांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
​ खारेपाटण हायस्कूल येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहणाचा कार्यक्रम खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.यावर्षी शालेय प्रशासनाने शाळेची सेवा करणाऱ्या श्रीम.सुशीला कांबळे यांना हा बहुमान देण्याचा निर्णय घेऊन
​ श्रीम.कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलें.तर कामगार दिनानिमित्त त्याच्या विशेष सत्कार देखील शाळेच्या वतीने अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
​ या कार्यक्रमाला खारेपाटण पंचायत समिती सदस्य श्री गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. रघुनाथ राणे,सचिव श्री.महेश कोळसुलकर,संचालक श्री विजय देसाई,खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री संतोष पाटणकर,श्री हेमंत देवस्थळी, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे सर्व विश्वस्त, पदाधिकारी,मुख्याध्यापक श्री संजय सानप,पर्यवेक श्री संतोष राऊत, शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यामागे शाळेच्या स्वच्छता कर्मचारी श्रीम.कांबळे व त्यांच्या सहकारी कर्मचारी वर्गाचे मोठे योगदान आहे.त्यांच्या या कष्टाची व मेहनितीची दखल घेऊन त्यांना १ मे महाराष्ट्र दिनी ध्वज फडकविण्याचा मान देण्यात आला.
तर ​स्वतः सुशीला कांबळी यांनी देखील आपला आनंद व्यक्त करताना सांगितले की, “आजवर शाळेत अनेक कार्यक्रम पाहिले, पण या पद्धतीने मिळणारा सन्मान पाहून डोळे भरून आले. कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या उपक्रमाचे संपूर्ण खारेपाटण परिसरातून कौतुक होत आहे. या छोटेखानी पण गौरवशाली सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा (Dignity of Labour) जपण्याचा एक मोलाचा संदेश गेला आहे.