दोन चिमुरड्यांसह चार प्रवासी बालंबाल बचावले
कुडाळ (प्रतिनिधी) : येथील तहसील कार्यालयाजवळील मुख्य रस्त्यावर सायंकाळी एक भीषण अपघात घडला. पिंगुळीहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या एका बोलेरो जीपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही जीप थेट दुभाजकावर चढली. सुदैवाने, या अपघातात दोन लहान मुलांसह चार प्रवासी सुखरूप बचावले असून मोठा अनर्थ टळला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कुडाळ कॉलेज चौक ते अभिमन्यू हॉटेल दरम्यान घडली. बोलेरो जीप पिंगुळीकडून सावंतवाडीकडे जात असताना तहसील कार्यालयाजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. वेगात असलेली जीप रस्ता दुभाजकावर चढली आणि तिची पुढची चाके दुसऱ्या बाजूच्या लेनवर जाऊन थांबली. हा अपघात इतका विचित्र होता की यामध्ये सिमेंटच्या दुभाजकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताचा भीषण आवाज होताच परिसरातील नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली होती. जीपमध्ये अडकलेल्या प्रवाशांना तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेनंतर मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला होता.












