कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, त्यांना विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांनी विज्ञानामध्ये उच्च शिक्षण घ्यावे व विद्यार्थ्यांच्या मध्ये असलेल्या उपजत कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने कणकवली महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवलीचे संचालक अनिलपंत डेगवेकर, प्रमुख पाहुण्या प्रा. डॉ. स्मिता सुरवसे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य श्री. युवराज महालिंगे, ज्युनियर विभाग पर्यवेक्षक महादेव माने, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शामराव डिसले, कणकवली कॉलेजच्या विज्ञान मंडळाचे सचिव डॉ. किरण जगताप आधी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. प्रास्ताविकात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व आणि यावर्षीच्या विज्ञान विषयक उपक्रमांची व विविध स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांची माहिती देण्यात आली. या वर्षी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने “विज्ञानात महिलांचा सहभागः विकसित भारतासाठी प्रेरणा” ही थीम जाहीर केली होती. त्याला अनुसरून डॉ. स्मिता सुरवसे यांनी आपल्या भाषणात विज्ञानाच्या क्षेत्रातउल्लेखनीय व भरीव कामगिरी केलेल्या भारतीय महिलांचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये भारताच्या पहिल्या जैव रसायन शास्त्रज्ञ कमला सोहोनी, हवामान शास्त्रज्ञ व उपकरणनिर्मिती क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या अण्णा मनी, अंतराळ मोहिमेद्वारे भारताचे नाव जगात उंचावणाऱ्या कल्पना चावला, मिसाईल वूमन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेसी थॉमस, पहिल्या महिला डॉ. आनंदी जोशी इत्यादी महिला वैज्ञानिकांची उदाहरणे दिली. उदाहरणे दिली. या सर्व महिला वैज्ञानिकांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपले संशोधन कार्य चालू ठेवून समाजासाठी कार्य केले आहे, असे सांगितले. विज्ञान दिनानिमित्त तीन मिनिटांमध्ये वैज्ञानिक विषय घेऊन त्याचे सादरीकरण करणे, वैज्ञानिक लेखन स्पर्धा, पोस्टर प्रस्तुतीकरण स्पर्धा व रील निर्मिती स्पर्धा, अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात श्री. अनिलपंत डेगवेकर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ विचारसरणी जोपासण्याचे आवाहन केले. प्राचार्य श्री. युवराज महालिंगे यांनी जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न तयार होत नाहीत, तोपर्यंत विज्ञान पुढे जाणार नाही असे नमूद केले. तसेच कल्पनाशक्ती ही निसर्गाची देण आहे, ती राष्ट्रहितासाठी वापरावी व नवनवीन कल्पना जागृत ठेवून विज्ञानाला नवी दिशा द्यावी, असे आवाहन प्राचार्य श्री युवराज महालिंगे सर यांच्या वतीने करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विज्ञान विभागाचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी हर्षदा प्रभू व नाज शेख यांनी केले. बक्षीस वितरण वाचन प्रा. गीतांजली नार्वेकर आणि आभार प्रदर्शन डॉ. सुरेश हुसे यांनी केले.













