सिलिंडर वितरणातील घोळ संपता संपेना

कणकवली (प्रतिनिधी) : येथील एलपीजी गॅस सिलिंडरचा लपंडाव संपता संपत नाही. नियमानुसार बुकींग २५ दिवसांनी व त्यानंतर तीन दिवसांत सिलिंडर मिळण्याचे जाहीर केले असले, तरीही येथे बुकींग होऊन आठवडा झाला, तरीही सिलिंडर मिळणे कठीण बनले आहे. मात्र, शहरातील एका एजन्सीकडे ही स्थिती असून दुसऱ्या एजन्सीकडे बुकींगच्याच दिवशी डीएसी नंबर मिळून सिलिंडरही मिळतो, असे चित्र आहे. त्यामुळे ग्राहक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सध्या सिलिंडर बुकींग करण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी उलटल्याशिवाय बुकींग होत नाही. शासनाच्या निकषानुसार त्यानंतर ७२ तासांत सिलिंडर उपलब्ध होणे अपेक्षित आहे. बुकींग केल्यानंतर पूर्वी लागलीच डीएसी नंबर येत असे. मात्र, आता बुकींग केल्यानंतर रेफरन्स नंबर येतो. डीएसी नंबर आठवडाभरात येत असल्याचे दिसते. डीएसी नंबर आल्याशिवाय सिलिंडरसाठीची पावती केली जात नाही. डीएसी नंबर आल्यानंतर एजन्सीकडे जाऊन रांगेत राहवे लागते. याला आठवडा उलटून जातो. त्यामुळे २५ दिवसांत बुकींग असले, तरीही प्रत्यक्ष सिलिंडर मिळण्याला ३५ दिवसांपर्यंत कालावधी लागत आहे. पुढील बुकींग १० दिवसांनी वाढत आहे. दरम्यान, शहरातील एका एजन्सीकडे ही स्थिती असून दुसऱ्या एजन्सीकडून बुकींगनंतर तीन तासांत डीएसी नंबर येऊन सायंकाळपर्यंत सिलिंडरही पोहोच होत असल्याचे दिसते. या प्रकाराबाबत ग्राहकांमधून संताप व्यक्त होत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी होत आहे.