सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : हसतमुख स्वभाव, प्रत्येकांच्या मदतीला तत्पर धावून जाणारा आणि सर्वांशी आपुलकीचे नाते जपणारा राकेश रविंद्र बोंद्रे (वय ३०, रा. ओरोस बुद्रुक) या तरुणाने राहत्या घरी दुपारी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे गावावर शोककळा पसरली आहे. आत्महत्या का केली त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश दुपारी आपली वैयक्तिक कामे आटोपून मित्रांसोबत गप्पा मारत होता. त्यानंतर तो घरी गेला. काही वेळाने त्याची आई घरी परतली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलाची अवस्था पाहताच आईने टाहो फोडला. तिचा आक्रोश ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घराकडे धाव घेतली.













