Breaking News

कोकणातून तुळशीदास रावराणे यांची राज्य कृषी पणन मंडळावर संचालकपदी नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंधुदुर्गचे सभापती तुळशीदास तुकाराम रावराणे यांची महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळावर संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण महसुली विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, पालकमंत्री नितेश राणे, खा. नारायण राणे, तसेच योगेश सावंत, बंडू ठाकूर यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
गेल्या २५ वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्वतंत्र मार्केट यार्ड नव्हते. मात्र, तुळशीदास रावराणे यांनी पुढाकार घेत खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमीन खरेदी करून आधुनिक मार्केट यार्ड उभारणीचा प्रकल्प सुरू केला. सध्या या प्रकल्पाचे बांधकाम सुरू असून, बाजार व्यवस्थेत सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेतकरी हिताच्या विविध उपक्रमांमुळे त्यांच्या कार्याची शासन स्तरावर दखल घेण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम ३९(ब) नुसार राज्य शासनाने ही नियुक्ती जाहीर केली आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळात विविध उच्चपदस्थ अधिकारी व प्रतिनिधींचा समावेश असतो. या महत्त्वपूर्ण मंडळावर कोकण विभागातून तुळशीदास रावराणे यांची निवड झाल्याने सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील शेतकरी, बागायतदार आणि बाजार व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

नियुक्तीबद्दल तुळशीदास रावराणे यांनी खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, पणनमंत्री जयकुमार रावल तसेच सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांचे आभार मानले आहेत.

“कृषी उत्पन्न बाजार समिती आणि राज्य कृषी पणन मंडळ यांच्यात समन्वय साधून शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला अधिकाधिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे,” अशी ग्वाही तुळशीदास रावराणे यांनी दिली.