मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगिवे येथे क्रेन घेऊन जाणारा कंटेनर पलटी होऊन अपघात

महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षतेमुळे एकच आठवड्यात सलग ६ वा अपघात

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे येथे एका अवघड वळणावर कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर वरील क्रेन पलटी होऊन झालेल्या अपघातात क्रेन सामनाचे मोठे नुकसान झाले. मात्र या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षतेमुळे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगिवे येथे झालेला हा गेल्या आठवडाभरातील सलग सहावा अपघात असून हा महामार्ग आहे की मृत्यूचा सापळा असा सवाल आता प्रवासी नागरिक करीत आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, तामिळनाडू येथून अवजड वाहन घेऊन मुंबई येथे जाणारा अशोक लायलेंड कंपनीचा कंटेनर वाहन क्र. MH 31FC 5333 हा मुंबई गोवा राष्ट्रीय महार्गावर “डेंजर झोन” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नडगिवे येथे सकाळी १०.३० च्या सुमारास आला असता येथील वाहळाच्या पुढील अवघड वळणावर वाहन चालक श्री हरिशकुमार यादव उर्फ नंदू याचा वाहनावरील ताबा सुटून झालेल्या अपघातात कंटेनर वर सुमारे ७२०० किलो वजन असलेली सांघवी मुव्हर्स लिमिटेड कंपनीची क्रेन पलटी होऊन नुकसान झाले. तर सदर क्रेन महामार्गाच्या बरोबर मध्ये पलटी झाल्याने काही काळ महामार्गावरील वाहतूक बंद झाली होती.

सदर अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण पोलिस दुरशेत्राचे पोलिस अधिकारी मिलिंद देसाई यांनी तातडीने अपघात स्थळी भेट दिली. तर महामार्ग सहाय्यक वाहतूक पोलिस निरीक्षक श्री गवस, पो. अंमलदार श्री नितीन शेट्ये, महामार्ग पोलिस श्री बिर्जे यांनी घटनास्थळी भेट देऊन विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करून क्रेन व जे सी पी च्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन पलटी झालेला क्रेन चा एक भाग बाजूला करून महामार्ग मोकळा करण्यात आला.

तसेच या अपघाताची माहिती मिळताच कणकवली पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे, शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव, खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी केली. महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून मार्ग मोकळा करण्याच्या सूचना दिल्या.