जिल्हा प्रशासन, ऑईल कंपन्यांमध्ये ताळमेळ नाही
कुडाळ (प्रतिनिधी) : जिल्हा प्रशासन व ऑईल कंपनीचे अधिकारी यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याने सिंधुदुर्गातील पेट्रोल पंपावर पेटोल व डिझेलची टंचाई भासू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून या टंचाईत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पेट्रोल पंप ड्राय होऊ लागले आहेत. आगावू रक्कम भरूनही आवश्यक मागणीनुसार पेट्रोल व डिझेलचा पुरवठा इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे टंचाई निर्माण होऊ लागली आहे. पेट्रोल पंप चालक-मालकही धास्तावले आहेत.
काही पंपावर एक-दोन दिवस पेट्रोल-डिझेलं नसते. त्यामुळे ग्राहकांचीही गैरसोय होत आहे. सर्वत्र घरगुती व व्यावसायिक गॅसचा तुटवडा भासत असताना आता पेट्रोल डिझेलची टंचाई भासत आहे. जिल्हा प्रशासन व पेट्रोल कंपन्यांचे अधिकारी यांच्यात योग्य समन्वय नसल्याने ही वेळ ओढावत आहे. पूर्वी पेट्रोल पंप चालकांना काही दिवसांच्या क्रेडिटवर पेट्रोल डिझेल दिले जायचे. मात्र, पंधरा दिवसापूर्वीपासून कंपनीने क्रेडिट देणे बंद केले आहे. संपूर्ण टँकरची पूर्ण रक्कम आधी भरल्यानंतर पेट्रोल-डिझेलचा पुरवठा करण्यास सुरुवात केली. मात्र, आता आगामी रक्कम भरूनही तीन-चार दिवस पेट्रोल पुरवठा होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५६ पेट्रोल पंप आहेत. दर दिवशी लाखो लिटर पेट्रोल व डिझेलची विक्री होते. सध्या मात्र पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने विक्री मंदावली आहे.












