Breaking News

मुंबई गोवा महामार्गावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई

गोवा बनावटी दारूसह सुमारे १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तः एक आरोपी ताब्यात

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवारी दुपारी १. ४५ वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत गोव्याहून मुंबईच्या दिशेने नेण्यात येणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूसह सुमारे १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत गोवा बनावटीची दारू, दहा टायरचा टाटा सिग्मा ट्रक आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला असून एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ४ जुलैला दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील जिजामाता चौक, ओरोस येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी विरेंद्र गोविंद पटेल (वय ४९, रा. लोलावत का मोहल्ला, धर्कदा, उदयपूर, राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत १ कोटी १५ लाख २० हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू, ३५ लाख रुपयांचा टाटा सिग्मा दहा टायर ट्रक आणि १० हजार रुपयांचा मोबाईल, असा एकूण १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ), (ई), ८१, ८३ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२), ३३६(२) (३), ३४० (२), ३(५) अन्वये सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.