Breaking News

पालकमंत्री नितेश राणेंचा मोठा निर्णय; राज्यातील मच्छिमारांना मिळणार सॅटेलाइट फोन सुविधा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील मच्छिमारांना सॅटेलाइट फोनची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यामुळे खोल समुद्रात मासेमारी करताना कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी संपर्क राखणे, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळवणे आणि हवामान व सुरक्षिततेबाबतच्या सूचना वेळेवर प्राप्त करणे त्यांना शक्य होईल. यासंदर्भात आज मंत्रालयात ‘भारत संचार निगम लिमिटेड’ (BSNL) च्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली आणि ‘बीएसएनएल ग्लोबल सॅटेलाइट फोन सर्व्हिस’ (GSPS) बाबत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी माहिती प्राप्त केली.

बीएसएनएलच्या सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे आणि या उपक्रमामुळे समुद्रातील दळणवळण अधिक कार्यक्षम होईल. तसेच, मासेमारी नौका आणि किनारा यांच्यात सतत संपर्क राहिल्याने, आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्यासाठी त्वरित प्रतिसाद देणे सोपे जाईल. यामुळे मच्छिमारांचा आत्मविश्वास वाढेल आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक सुरक्षित व आधुनिक होईल.

या बैठकीला मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) चे वरिष्ठ व्यवस्थापक श्री. सुहास मंककर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.