ओझरम शाळा नं. १ चा उपक्रम आदर्शवत; मराठी शाळा वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे – संदेश सावंत
कणकवली (स्वप्नील तांबे) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओझरम नं. १ येथे आयोजित विद्यार्थी-पालक प्रेरणा मेळावा उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. संदेश उर्फ गोट्या सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी संदेश सावंत यांनी शाळेसाठी बांधण्यात आलेल्या निवासी वसतिगृहाची पाहणी केली. त्यानंतर शिक्षक, ग्रामस्थ व पालकांशी संवाद साधत मराठी शाळांसमोरील विविध समस्या जाणून घेतल्या. मराठी शाळांमधील घटती पटसंख्या ही चिंतेची बाब असून त्यामुळे अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत ओझरम शाळा नं. १ ने विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी आणि शाळेचा विकास साधण्यासाठी राबविलेले विविध उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून या शाळेचा आदर्श इतर शाळांनीही घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या ईशस्तवनानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांनी शिक्षणाचे महत्त्व, पालकांची भूमिका आणि मराठी माध्यमाच्या शाळा टिकविण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज यावर मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रेरणा मेळाव्यास उपाध्यक्ष ओझरम सेवा मंडळ मुंबई अशोक राणे, माजी सभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, माजी सभापती विनायक राणे, पंचायत समिती सदस्य सहदेव (अण्णा) खाड्ये, सरपंच समृद्धी राणे, उपसरपंच गणेश राणे, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिपक सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश राणे, निवासी संकुल दक्षता समितीचे अध्यक्ष एल. डी. राणे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सदाशिव (बाबू) राणे, माजी सरपंच प्रदीप राणे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बंडू राणे, सामाजिक कार्यकर्ते बाळा राणे यांच्यासह ग्रामस्थ, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक राणे यांनी केले. दिलीप तळेकर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या, तर प्रमुख मार्गदर्शन मा. संदेश सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री. विनायक जाधव यांनी केले. उपस्थितांचे आभार शालिनी तांबे यांनी मानले.
ओझरम शाळा नं. १ येथे आयोजित विद्यार्थी-पालक प्रेरणा मेळाव्यामुळे मराठी शाळांचे महत्त्व अधोरेखित झाले असून, शिक्षणाच्या गुणवत्तेबरोबरच समाजाच्या सक्रिय सहभागातून शाळा सक्षम करण्याचा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.














