कणकवली (प्रतिनिधी) : उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत औषधी वनस्पती लागवड उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमात वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, परिचारिका तसेच इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत विविध औषधी झाडांची लागवड केली.
रुग्णालय परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्याबरोबरच औषधी वनस्पतींचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन करून त्यांचे संवर्धन करण्याची प्रतिज्ञा केली.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन डोंगरे यांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांमध्ये प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. रुग्णालय परिसरात भविष्यातही विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वै. अधि.डॉ. पंकज पाटील, प्रशांत बुचडे, विजय चौरे, अमोल माने, सुनील यादव, सी. आर सावंत, मधुरा राणे, कविता राऊळ आदी उपस्थित होते.













